अरुण नरके फौंडेशनविषयी :


जीवनाच्या उद्यानात हिरव्यागर्द पिकांसारखं उगवून, बहरून आणि फुलून यायची इच्छा असेल तर स्वतःला पेरून घेण्याची तीव्र इच्छा असली पाहिजे कारण जे मनाच्या तीव्र ध्यासाने त्यागपूर्वक पेरून घेतात तेच पुढे उगवून येतात म्हणूनच असं म्हटलं गेलं की, चांगले विचार पेरले की चांगली कृती उगवते, चांगली कृती पेरली की चांगले चारित्र्य उगवून येते आणि चारित्र्याची रूजवणूक केली की,समाजाला योग्य दिशा दाखवणारे 'आदर्शाचे दीपस्तंभ' तयार होतात, म्हणूनच उज्ज्वल राष्ट्र निर्मितीसाठी त्यागाची, संस्कारांची आणि शौर्यवंतांची उज्ज्वल परंपरा असणाऱ्या राजर्षी शाहूंच्या भुमीत १९९४ साली ‘अरूण नरके फौंडेशन’(NGO)या न्यासाचा शुभारंभ झाला.

कृषी, दुग्धव्यवसाय, सहकार आणि क्रिडा क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्ती म्हणून संपूर्ण महाराष्ट्र अरुण नरके साहेबांना ओळखतो. पाच दशकांहून अधिक काळ या क्षेत्रांमध्ये आपले विविधांगी योगदान आदरणीय अरुण नरके साहेब देत आहेत. अरुण नरके साहेबांच्या पन्नासाव्या जन्मदिनाच्या औचित्याने सामाजिक क्षेत्रात योगदान देणारी सेवाभावी संस्था स्थापावी आणि त्याद्वारे समाज जीवनाच्या प्रत्येक आघाडीवर व्यापक प्रमाणातील लोकोन्नतीचे कार्य सर्वदूर पसरावे अशा उदात्त हेतूंनी अरुण नरके साहेब आणि त्यांच्या मित्र परिवाराने २९ नोव्हेंबर १९९४ रोजी अरुण नरके फौंडेशन(NGO) ची स्थापना केली. संस्थेचे संस्थापक मा.श्री.अरुण नरके, संस्थेचे अध्यक्षपद भूषविलेले श्री.रामचंद्र पाटणकर, श्री. रवींद्र उबेरॉय, श्री. पी.टी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली संस्था उत्तरोत्तर बहरत गेली. आज २७ वर्षांचा सामाजिक व स्पर्धा परीक्षा क्षेत्रांतील हा मोठा टप्पा यशस्वीरीत्या पार केल्यानंतर फौंडेशनच्या अध्यक्ष पदाची धुरा नव्या पिढीकडे आली आहे.

उच्चविद्याविभूषित असलेले आणि जागतिक पातळीवरील मोठ्या संस्थांच्या कामाचा अनुभव असलेले मा.श्री. चेतन अरुण नरके साहेब आता अरुण नरके फौंडेशन (NGO) च्या अध्यक्ष पदाची जबाबदारी मोठ्या उत्साहाने सांभाळत आहेत, त्यांची समाजाप्रती असणारी संवेदनशीलता, अचूक अर्थविषयक विश्लेषण, समस्यांचे निराकरण करण्यासाठी असणारी सततची धडपड आणि नाविन्याची आस या कार्यपद्धतीतून निश्चितच संस्थेचा आणखी विकास आणि विस्तार होणार आहे.

आजमितिस राजर्षी शाहूंच्या करवीर नगरीतील या फौंडेशनमध्ये स्पर्धापरीक्षा विभागातून सामान्य शेतकरी कुटुंबातील, शहरी व ग्रामीण भागातील ४६५० हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न साकारले आहे, तसेच फौंडेशनच्या विविध सामाजिक व शैक्षणिक सेवेतून आजपर्यंत ७,००,००० (सात लाख) हून अधिक लाभार्थानी लाभ घेतला आहे, हे फौंडेशनच्या सेवाकार्याचे साफल्य आहे असे मनापासून वाटते, संस्थेकडून अप्रत्यक्षरित्या देशसेवेचे कार्य घडते याचा आम्हास सार्थ अभिमान आहे.

केवळ अर्थाजनांचा हेतू बाजूला ठेऊन सामाजिक बांधिलकीच्या प्रेरणेने, सेवाभावी वृतीने समृद्ध भारत घडविण्यासाठी व्यसनमुक्ती अभियान, रक्तदान शिबिर, गडकोट किल्ले संवर्धन, स्वच्छता अभियान, बालवाडी प्रकल्प, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, वाड्या वस्तीतील मुलांना शालेय साहित्यांचे वाटप, HIV पॉझिटिव्ह, निराधार महिला,तृतीय पंथी, पूरग्रस्त व वृद्धाश्रमांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, मोफत आरोग्य तपासणी, मानसशास्त्रीय समुपदेशन, महिला सबलीकरण अंतर्गत युवती स्व-संऱक्षण शिबिर, जनजागृती पथनाट्य, वृक्षारोपण अशा विविध सामाजिक उपक्रमातून अरुण नरके फौंडेशन गेली २७ वर्षे अखंडीतपणे सामाजिक कार्य करत आहे.

सध्याच्या कोविड-19 प्रतिबंधासाठी जिल्हास्तरावर शासनासमवेत अरुण नरके फौंडेशनने ग्रामीण भागातील जनतेला मास्क , सॅनिटायझर,जीवनाआवश्यक वस्तूं , इम्युनिटी बुस्टरचे वाटप तसेच पोलीस दलातील बांधवाना मोफत मास्क व हॅन्डग्लोज चे वाटप करण्यात आले आहे.

आजच्या समाजात खूप काम करायचे आहे. सामाजिक शिक्षणापासून ते आरोग्यापर्यंत आणि व्यवसायाच्या मार्गदर्शनापासून ते सामाजिक प्रबोधनापर्यंत नवीन पिढीपर्यंत विविध स्तरांवर कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हे काम करायचे आहे. काही कामे श्रमातून निर्माण होतात, काही कामे मार्गदर्शनातून निर्माण होतात. परंतु काही कामे आर्थिक ताकदीशिवाय उभी राहू शकत नाहीत आणि म्हणूनच अरुण नरके फौंडेशनला बळकट करण्याची गरज आहे. सामाजिक जाणीव अजूनही कायम आहे, सामाजिकतेची जाणीव अजूनही विविध प्रसंगांद्वारे जगात कुठेतरी सतत जागृत आहे. यासाठी अशा व्यक्ती / संस्थांचे आम्हास सहकार्य अपेक्षित आहे.

संस्था स्थापनेपासून आजपर्यंत समाजहिताचे अविरत कार्य चालू आहे आणि यापुढेही नवनवीन कल्पना,उपक्रमासह हे समाजकार्य अखंडित चालू राहील.