संस्थापक (About Founder)
अरुण नरके साहेब ही आता व्यक्ती राहीली नसून ती संस्था झाली आहे. सहकार, शिक्षण, क्रीडा, बँकिंग, शेती, युवा, राजकीय, सामाजिक अशा विविध क्षेत्रावर अरुण नरके साहेब यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा आणि कार्य कुशलतेचा ठसा उमटवला आहे. ‘अरुण नरके’ साहेब या नावाला एक वलय आहे आणि हे वलय दुग्ध व्यवसायातल्या त्यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील कामगिरीने अधिकच विस्तारले आहे. महाराष्ट्रात या नावाला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.
ज्या वेळी अरुण नरके साहेब यांनी सुवर्णमहोत्सवी जीवनप्रवास पुरा केला, त्यावेळी त्यांचा पन्नासावा वाढदिवस सर्वांच्याच स्मरणात कायम रहावा या दृष्टीने एक निधी गोळा करावा आणि त्या निधीतून अनेक उपक्रमांचे नियोजन करावे, ते करताना अरुण नरके साहेब यांना अभिप्रेत असलेले आणि त्यांनी ज्या ज्या क्षेत्रात काम केले त्या क्षेत्रांचा विचार करावा आणि त्याही क्षेत्रात काम करावे असा विचार झाला, या कल्पनेतूनच सुमारे पन्नास लाखांचा निधी गोळा झाला. आमच्या या आवाहनाला साऱ्या क्षेत्रातून आणि गावपातळीपासून शहरापर्यंत सर्व थरातल्या व्यक्ती व संस्थांनी आमच्या कल्पनेचं स्वागत केलं, त्या कल्पनेला सक्रीय प्रतिसाद दिला. आजच्या स्पर्धेच्या युगात भरकटलेल्या युवक-युवतींना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करुन देत असतानाच त्यांना प्रसंगी धीर देण्याचं आणि योग्य मार्गदर्शन करायचं काम अरुण नरके फौंडेशन करत आहे. सध्या विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केले जातं, विद्यार्थांच्या गुणांचा अचूक उपयोग कसा करता येतो याविषयी अनेक तज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ अरूण नरके फौंडेशनने विद्यार्थांना करून दिला आहे.
अरुण दत्तात्रय नरके सोI हे सामाजिक क्षेत्रातलं भारदस्त नाव! दुग्ध व्यवसाय आणि सहकार या क्षेत्राशी अरुण नरके साहेब यांचे नांव त्या क्षेत्रातल्या कामामुळे जोडले गेले. सामाजिक जाणिवांचे भान कायम ठेवून ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंतचे अनेक छोटे मोठे प्रश्न शांत, संयमी स्वभावाने त्यांनी हाताळले आहेत. प्रत्येक क्षेत्रात स्पर्धक असावेत पण शत्रू नसावेत असं म्हणतात, पण अरुण नरके साहेबांनी आपल्या स्वभावाने स्पर्धक आणि शत्रू या दोघांनाही आपलंसं करुन घेतलं.
संकटात मदतीला धावून जाणं हा त्यांचा स्थायीभाव..! धावणाऱ्याला प्रोत्साहन देण्याची वृत्ती..! त्यामुळे सर्वच क्षेत्रात त्यांनी आपला असा वेगळा ठसा उमटविलेला आहे. स्वतःचं वेगळेपण सिद्ध केले. मात्र ते सिद्ध करताना आपली लीनता कधी सोडली नाही. जेष्ठ, श्रेष्ठ व्यक्तीपासून ते तळागळातल्या लहान कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनाच ते हवेहवेसे वाटतात.ते याच कारणाने ! सहकार, शिक्षण, क्रीडा, शेती, दुग्ध व्यवसायापासून ते अनेक साहित्यिक, कवी, कलाकारांना विविध स्वरूपात आधार द्यायचं काम काम अरुण नरके साहेब यांनी केलं आणि आपल्या कार्यपद्धतीचा ठसा या क्षेत्रांवर उमटवला. ज्या ज्या व्यक्तीत काही विशेष गुण जाणवले ते आपल्यात कसे आणता येतील याचा सतत ध्यास असणारं हे व्यक्तीमत्व!
आज अरुण नरके सोI घरात जसे वडील, आजोबा, सासरे अशा विविध नात्यांनी वावरत आहेत त्याच प्रमाणे मित्र परिवारात व व्यवसायात अरुण नरके साहेब म्हणून सर्वांनाच परिचित आहेत, त्यांनी विविध क्षेत्रात मिळवलेले राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार पाहिले म्हणजे त्यांच्या स्वप्नांची झेप सर्वांनाच जाणविल्याशिवाय राहात नाही.
थोरसमाजसेवक बाबा आमटे यांनी एके ठिकाणी म्हटलं आहे की, हात उभारण्यासाठी असतात, उगारण्यासाठी नसतात. अरुण नरके साहेब यांनी आजपर्यंत अनेक हात हातात घेऊन जीवन प्रवास केला, उगारण्यासाठी उभारलेल्या अनेक हातांचे रूपांतर अरुण नरके यांनी सामाजिक कार्याची धुरा वाहण्यासाठी केलं.